Skip to content

येशू लोकांना शिकवितो

येशू लोकांना शिकवितो

5 येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली. तो म्हणाला,

“जे आत्म्याने दीन ते धन्य,
    कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
जे शोक करतात ते धन्य,
    कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.
जे नम्र ते धन्य,
    कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.
ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य,
    कारण ते तृप्त होतील.
जे दयाळू ते धन्य,
    कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
जे अंतः करणाचे शुद्ध ते धन्य
    कारण ते देवाला पाहतील.
जे शांति करणारे ते धन्य,
    कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
10 नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
    कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

11 “जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. 12 आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.

तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात

13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16 तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

येशू आणि जुन्या करारातील संदर्भ

17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.

19 “म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.

रागासंबंधी येशूची शिकवण

21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’ [a] 22 पण मी तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, 24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.

25 “वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकील. 26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.

लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण

27 “‘व्यभिचार करू नको’ [b] असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा. 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.

घटस्फोटाविषयी येशूची शिकवण

31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’ [c] असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.

शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन

33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर, [d] असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे. 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे. 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे. 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही. 37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.

सुडासंबंधी येशूची शिकवण

38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’ [e] 39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा. 40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या. 41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा. 42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.

सर्वांवर प्रेम करा

43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा [f] अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,’ असे तुम्ही ऐकले आहे. 44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. 46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात. 47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात. 48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

मत्तय 5

दान देण्याविषयी येशूची शिकवण

6 “जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.

“जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहीरपणे अशी कामे करतात, कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये. दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.

प्रार्थनेविषयी येशूची शिकवण

“जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.

“आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.

‘हे आमच्या स्वर्गातील पित्या,
    तुझे नाव पवित्र मानले जावो.
10 तुझे राज्य येवो,
    जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
11 आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.
12 जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो
    तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,
13 आम्हांला परीक्षेत आणू नकोस
    तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’

14 कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील; 15 पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.

उपासाविषयी येशूची शिकवण

16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. 17 तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. 18 यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.

पैशापेक्षा देव अधिक महत्त्वाचा आहे

19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21 जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

22 “डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. 23 पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.

24 “कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

देवाच्या राज्याला प्रथमस्थान द्या

25 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. 26 आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे. 27 आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?

28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत, 29 तरी मी तुम्हांला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर ऐश्र्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हता. 30 तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते, अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालणार नाही काय?

31 “चिंता करू नका आणि असे म्हणू नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ 32 सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. 33 तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील. 34 म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.

इतरांचा न्याय करण्याविषयी येशूची शिकवण

7 “तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करु नका. कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.

“तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.

“जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती त्यांना पायदळी तुडवतील.

तुमच्या सर्व गरजा देवाला सांगा

“मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल, कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.

“तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल? 10 किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल? 11 वाईट असूनही जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?

अति महत्त्वाचा नियम

12 “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.

स्वर्गाकडे जाणारा मार्ग आणि नरकाकडे जाणारा मार्ग

13 “अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. 14 पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोडयांना तो सापडतो.

लोक काय काय करतात ते पाहा

15 “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. 16 त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यांस ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाइटाला चांगले फळ येत नाही. 17 प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते. 18 चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. 19 जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. 20 म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.

21 “जो कोणी मला वरवर प्रभु, प्रभु म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’ 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

शहाणा मनुष्य व मूर्ख मनुष्य

24 “जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा सुज्ञ माणसाने आपले घर खडकावर बांधले. 25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.

26 “जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणासासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. 27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

28 जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला. 29 कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.

मत्तय 6-7