Skip to content

माणसे दुष्ट होतात

6 पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या; त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.

या स्त्रीयांनी मुलांना जन्म दिला, त्या काळी व त्यानंतर पृथ्वीवर नेफिलिम लोक राहात होते. ते फार नामांकित होते. ते प्राचीन काळापासूनचे महावीर होते.

नंतर परमेश्वर म्हणाला, “मनुष्य हा देहधारी आहे, तो भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्यांच्या ठायी सर्वकाळ राहणार नाही; म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत-त्रास होऊ देणार नाही; तर मी त्यांस एकशेंवीस वर्षांचेच आयुष्य देईन.”

परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात. म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरला वाईट वाटले; आणि तो मनात फार दु:खी झाला; तेव्हा तो म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरुन नष्ट करीन; तसेच माणसे, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दु:ख होत आहे.”

परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता तो म्हणजे नोहा.

नोहा आणि जलप्रलय

ही नोहाच्या घराण्याची कहाणी आहे. नोहा आयुष्यभर त्या पिढीतला नीतिमान माणूस होता. तो नेहमी देवाच्या आज्ञांप्रमाणे चालला 10 नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन मुलगे होते.

11 देवाने पृथ्वीकडे पाहिले तेव्हा माणसांनी ती भ्रष्ट केली आहे असे त्याला आढळले. 12 जिकडे तिकडे हिसांचार चालू होते; लोक वाईट व क्रूर झाले होते; त्यांनी पृथ्वीवर आपल्या जीवनाचा नाश करुन घेतला होता.

13 म्हणून देव नोहाला म्हणाला, “मनुष्यांनी सर्व पृथ्वी संतापांने व हिंसेने भरुन टाकली आहे; म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करीन; त्यांचा पृथ्वी तलावरुन नायनाट करीन 14 तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर झाडाच्या लाकडाचे एक तारु कर; त्यात खोल्या कर आणि त्याला सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरुन डांबर लाव.”

15 देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते 300 क्यूबिट लांब, 50 क्यूबिट रुंद, आणि 30 क्यूबिट उंच असावे; 16 तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला व खालचा असे तीन मजले कर.

17 “मी सांगतो ते समजून घे. मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. मी पृथ्वीवरील सर्वलोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन. 18 मी तुझ्याशी एक विशेष करार करतो; तू आपले मुलगे, आपली बायको व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा. 19 तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यापैकी एक नरमादीची जोडी तू तारवात ने, त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 20 पक्षी, पशू आणि भूमीवर रांगणारे प्राणी या पैकी प्रत्येकाच्या जातीतून नरमादी असे दोनदोन तुझ्याबरोबर तरवात ने; त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 21 तसेच तुला व त्यांना लागणारे पृथ्वीवरील सर्व प्रकारचे अन्न तारवात साठवून ठेव.”

22 देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले.

जलप्रलयाची सुरवात

7 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान माणूस आहेस असे मला आढळले आहे; तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा. अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यापैकी नरमाद्यांच्या सात जोड्या, इतर अशुद्ध प्राण्यापैकी नरमादी अशी एकच जोड़ी, आणि पक्षांच्या नरमादी अशा सात जोड्या तुझ्याबरेबर तारवात नें. पृथ्वीवर त्यांचे बीज राहील आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडीन; त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल.” परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.

पाऊस आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. जलप्रलयातून तरुन जावे म्हणून नोहा व त्याचे सह त्याचे कुटुंब म्हणजे त्याची बायको, त्याचे मुलगे व सुना हे तारवात गेले. तसेच पृथ्वीतलावरील सर्व शुद्ध व अशुद्ध पशूपक्षी, सरपटणारे व रांगणारे प्राणी हे सर्व देवाने सांगितल्याप्रमाणे नर व मादी अशा जोडी जोडीने नोहाबरोबर तारवात गेले. 10 मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरवात झाली.

11-13 दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्वझरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले; त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली; जणू काय आकाशाच्या खिडक्या उघडल्या; चाळीस दिवस व चाळीस रात्र मुसळधार पाऊस पडला. त्याच दिवशी नोहा, त्याची बायको, त्याचे मुलगे शेम, हाम व याफेथ व त्यांच्या बायका ही सर्वमंडळी तारवात गेली. त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. 14 नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी म्हणजे सर्व जातीची गुरेढोरे इतर पशू जमिनीवर सरपटणारे आणि आकाशात उडणारे पक्षी हे तारवात होते. 15 आणि ज्यांच्या जीवात प्राण आहे असे सर्व प्रकारचे प्राणी दोन दोनच्या गटाने तारवात गेले. 16 देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर व मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले.

17 चाळीस दिवस पृथ्वीवर महापुर पाणी आले; 18 पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले; 19 पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले; 20 पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले.

21-22 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी, म्हणजे सर्व स्त्री, पुरुष, तसेच सर्व पक्षी, गुरेढोरे, ग्रामपशू, वनपशू सरपटणारे प्राणी हे सर्व जीव जंतू मरुन गेले. 23 अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच. 24 पाण्याने एकशे पन्नास दिवस पृथ्वीला झाकून ठेवले होते.

जलप्रलयाचा शेवट

8 पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.

आकाशातून मुसळधार पडणारा पाऊस थांबला; आणि पृथ्वीच्या पोटातून उफाळून वर येणारे सर्व झऱ्यांचे पाणी वाहाण्याचे थांबले, 3-4 पृथ्वी भरुन टाकलेले पाणी ओसरुन खाली खाली जाऊ लागले. दिडशे दिवसानंतर पाणी इतके खाली आले की त्यामुळे सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारु आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले; पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली.

चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला. जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले.

जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले.

10 सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले; 11 तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले, 12 आणखी सात दिवसांनी नोहाने कबुतराला पुन्हा बाहेर सोडले परंतु यावेळी मात्र ते परत आले नाही.

13 त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता. 14 दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत जमीन खडखडीत कोरडी झाली होती.

15 नंतर देव नोहाला म्हणाला, 16 “तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ; 17 तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.”

18 तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला; 19 त्याच्या बरोबरचे सर्व पशू, रांगणारे प्राणी व पक्षी जातवारीने जोडीजोडीने तारवातून बाहेर निघाले.

20 त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले.

21 परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वतःस म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा; 22 जोपर्यंत पृथ्वी राहील तो पर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहींत.”

नवीन सुरवात

9 देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला. तो त्यांना म्हणाला, “पुष्कळ मुलांबाळांना जन्म द्या; आणि तुमच्या संततीने पृथ्वी भरुन टाका. पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे, तुमचे भय धरतील; ते सर्व तुमच्या सत्तेखाली असतील. ह्या आधी मी तुम्हाला, खाण्याकरिता हिरव्या वनस्पती दिल्या; आता सर्व प्राणीही तुमचे अन्न होतील. मी पृध्वीवरील सर्व काही तुमच्या हाती देतो. ते सर्व तुमचे आहे. पण मी तुम्हांस एक आज्ञा देतो की रक्तासकट मांस तुम्ही खाऊ नका कारण रक्त हे त्याचे जीवन आहे; तसेच मी तुमच्या जीवाबद्दल रक्ताची मागणी करीन म्हणजे माणसाला ठार मारणाऱ्या कोणत्याहीं पशूच्या जीवाची मी मागाणी करीन आणि माणसाचा जीव घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाची मी मागणी करीन.

“देवाने माणूस आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्न केला आहे.
    म्हणून जर एखादी व्यक्ति एखाद्या व्यक्तिद्वारे ठार मारली गेली तर ती व्यक्तिपण त्याच व्यक्तिद्वारेच ठार केली जाईल.

“नोहा, तू व तुझी मुले तुम्हाला भरपूर संतती होवो व तुमच्या लोकांद्वारे पृथ्वी भरली जावो.”

मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, “मी आता तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी एक करार करतो; 10 तसेच तुमच्या सोबत जे पक्षी, गुरेढोरे, पशू आणि इतर जे प्राणी तारवातून बाहेर आले त्यांच्याशीही एक करार करतो म्हणजे सर्व सजीव सृष्टीशी मी करार करतो; 11 तो करार असा: पृथ्वीवरील सर्वप्राणीमात्र जलप्रलयामुळे नष्ट झाले पण येथून पुढे तसे कधीच होणार नाही, व सर्व सजीव सृष्टीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी येणार नाहीं.”

12 आणि देव म्हणाला, “मी तुम्हाशी हा करार केल्याची काही तरी खूण तुम्हाला देतो त्या खुणेवरुन (पुराव्यावरुन) मी तुम्हाशी व सर्व सजीव सृष्टीशी करार केल्याचे दिसेल. हा करार पिढ्यानपिढ्या व युगानुयुग कायम राहील. 13 मी ढगात साप्तरंगी धनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचा पुरावा म्हणून राहील. 14 मी जेव्हा पृथ्वीवरील ढग आणेल तेव्हा तुम्हाला ढगात सप्तरंगी धनुष्य दिसेल 15 जेव्हा मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, ह्या कराराप्रमाणे जलप्रलय पृथ्वीवरील जीवनांचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. 16 आणि ते धनुष्य पाहून कराराची मला आठवण होईल मी पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याशी चिरंतन काळासाठी केलेल्या कराराची मला आठवण होईल.”

17 तेव्हा देव नोहाला म्हणाला, “ते रंगीत धनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्वसजीव प्राण्यांमध्ये झालेल्या कराराचा पुरावा आहे.”

प्रश्नांची पुन्हा सुरुवात

18 नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; (हाम हा कनानाचा बाप होता.) 19 हे नोहाचे तीन मुलगे होते; यांच्या पासूनच पृथ्वीवर लोकवस्ती झाली.