जगाची सुरवात
1 देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.
पहिला दिवस-प्रकाश
3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला. 4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. 5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.
संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.
दुसरा दिवस—आकाश
6 नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.” 7 तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले. 8 देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस.
तिसरा दिवस—कोरडी भूमि व हिरवळ
9 नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले, 10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले. 12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस.
चौथा दिवस—सूर्य, चंद्र व तारे
14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. 15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले.
16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले. 17-18 देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौथा दिवस.
पाचवा दिवस—मासे व पक्षी
20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत.” 21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळ्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.”
23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस.
सहावा दिवस—जमिनीवरील प्राणी व मनुष्य प्राणी
24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळ्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले.
25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
26 मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.”
27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. 28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
29 देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील. 30 तसेच पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत.” आणि सर्व तसे झाले.
31 आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले.
संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.
सातवा दिवस—विसावा
2 याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले. 2 देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला. 3 देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.
मानवाची सुरवात
4 हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे. 5 त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
6 पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. 7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला. 8 मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. 9 परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली.
10 एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या. 11 पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते 12 त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सापडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात 13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते. 14 तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे.
15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 16 परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”
पहिली स्त्री
18 नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.”
19 परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली. 20 आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू—पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही. 21 तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली. 22 परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. 23 तेव्हा आदाम म्हणाला,
“आता ही मात्र माझ्यासारखी आहे.
तिची हाडे माझ्या हाडा पासून
व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे.
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो.
कारण ती नरापासून बनवलेली आहे.”24 म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
25 एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.