Skip to content

जॉन 13-16

येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो

13 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.

मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना, आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून, येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.

मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”

येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”

पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.”

येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”

शिमोन पेत्राने उत्तर दिले,“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”

10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.” 11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.

12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यवस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. 14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. 15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले. 16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.

18 “मी तुम्हां सर्वाविषयी बोलत नाही. ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत. परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे: ‘जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.’ [a] 19 हे होण्याअगोदरच मी तुम्हांस सांगतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा, की मी तो आहे. 20 मी तुम्हांस खरे सांगतो ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.”

येशू त्याच्याविरूद्ध कोण असेल ते सांगतो

21 असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”

22 तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. 23 आणि ज्याच्यावर येशू प्रीति करीत असे असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्याजवळ खेटून बसला होता. 24 शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावले आणि म्हणाला, “ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे विचार.”

25 तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याल म्हणाला, “प्रभु तो कोण आहे?”

26 येशूने उत्तर दिले, “ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडवून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला. 27 त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे ते लवकर कर.” 28 पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही. 29 कारण यहूदाजवळ पैशाचा व्यवहार होता. काहींना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरिबाला काही देण्याविषयी सांगत आहे.

30 यहूदाने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला कारण ती वेळ रात्रीची होती.

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

31 तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे. 32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.”

33 “माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.

34 “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा. 35 तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

पेत्र येशूला नाकारिल

36 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात?”

येशूने उत्तर दिले, “जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही. पण नंतर तू माझ्यामागे येशील.”

37 पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही? मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”

38 मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मला तीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

येशू शिष्यांचे समाधान करतो

14 “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”

थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”

येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”

फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.”

येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. 11 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

12 “मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.

पवित्र आत्म्याचे अभिवचन

15 “जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. 16 आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे. 17 साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.

18 “मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. 19 आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. 20 त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे. 21 ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन.”

22 मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”

23 येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. 24 जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”

25 “मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.

27 “शांति मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. 28 ‘मी जातो आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे. 29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.

30 “मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही. 31 परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो.

“चला आता, आपण निघू या.”

येशू द्राक्षवेल आहे

15 मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.

“मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.

“जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. 10 ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11 माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. 12 जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे. 13 आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही. 14 मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. 15 आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.

16 “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे 17 तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.

येशू त्याच्या अनुयायांना सूचना देतो

18 “जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे. 19 तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वतःवर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.

20 “जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्या पाळतील. 21 माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशाप्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले, त्याला ते ओळखत नाहीत. 22 जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.

23 “जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24 मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापाबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला. 25 परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’ [b]

26 “पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासून येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो. 27 आणि तुम्हीसुद्या माझ्याविषयी लोकांना सांगाल. कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात.

16 “मी हे सर्व तुम्हांला सांगितले आहे ते यासाठी की, तुम्ही माझ्यावरील विश्वासविषयी भुलविले जाऊ नये. ते तुम्हांला सभास्थानाच्या बाहेर काढतील; खरे पाहता अशी वेळ येत आहे की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की, आपण देवाची सेवाच करीत आहोत. आणि ते तुम्हांला असे जरूर करतील कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही. मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल.

पवित्र आत्म्याचे कार्य

“तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो. ‘तरी तू कोठे जातोस’ असे तुम्हांतील कोणी मला विचारीत नाही. पण या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण दु:खाने भरले आहे. तरी तुम्हांस खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर साहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.

“आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्य करील. मी पापाविषयी सांगितले तर, लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना त्यांची जाणीव करून देईल 10 नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल 11 हा साहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल. कारण या जगाच्या अधिपतीचा (सैतान) न्याय होऊन चुकला आहे.

12 “मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे. 13 पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल. 14 जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील. 15 जे सर्व पित्याचे आहे, ते माझे आहे. या कारणासाठीच मी म्हणालो, की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हांला कळवील.

दु:ख आनंदामध्ये बदलेल

16 “थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”

17 त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!” 18 ते विचारतच राहिले, “‘थोड्या वेळाने याचा अर्थ काय?’ तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”

19 येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’ 20 मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमचे दु:ख आनंदात बदलेल.

21 “जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते. 22 त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल. 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.

जगावर विजय

25 “जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन. 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंति करीन असे मी म्हणत नाही. 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीति केली व माझ्यावर विश्वास ठेवला की, मी देवापासून आलो. 28 मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”

29 मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही. 30 आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”

31 येशूने उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरू लागला काय? 32 पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”

33 “मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”

जॉन 13-16