Skip to content

मत्तय 21: 23-23: 39

यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात

23 येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

24 येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. 25 तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”

येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”

27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.”

तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.

येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो

28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’

29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.

30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.

31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”

ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”

येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.

देव आपला पुत्र पाठवितो

33 “ही बोधकथा ऐका: एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला. 34 जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.

35 “परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36 मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37 नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’

38 “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39 त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.

40 “मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41 यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”

42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.

‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला
    दगड कोनशिला झाला आहे हे
प्रभूने केले आणि
    आमच्यासाठी हे अदभुत आहे.’

43 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल. 44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”

45 येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. 46 त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.

लोकांना भोजनाला दिलेल्या आमंत्रणाची बोधकथा

22 येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकदा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.

“नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, ‘मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणी सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’

“नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला. काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले. राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.

“मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते, म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ 10 मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.

11 “मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. 12 राजा त्याला म्हणाला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला. 13 तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, ‘या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’

14 “कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”

काही यहूदी पुढारी येशूला फसवू पाहतात

15 मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. 16 परूशांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे (शिष्य) आणि हेरीदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही सर्वाना समान मानता. 17 म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”

18 येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? 19 कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. 20 तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”

21 त्या लोकांनी उत्तर दिले, “त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.”

यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”

22 येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.

काही सदूकी लोक येशूला फसवू पाहतात

23 त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले (हे लोक असे समजतात की पुनरूत्थान नाही) त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला, 24 ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील. 25 आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. 26 असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले. 27 शेवटी ती स्त्री मेली. 28 आता प्रश्न असा आहे की, पुनरूत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्यांशी लग्न केले होते.”

29 उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही. 30 तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरूत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. 31 तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय? 32 तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ [a] हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”

33 जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.

कोणती आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे?

34 येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. 35 एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. 36 त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”

37 येशूने उत्तर दिले, “‘प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ [b] 38 ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. 39 हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.’ [c] 40 सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”

ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?

41 म्हणून परूशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला. 42 येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?”

परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”

43 त्यावर येशू त्यांना म्हणाला, “मग दाविदाने त्याला ‘प्रभु’ असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,

44 ‘प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला,
मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत,
    माझ्या उजव्या बाजूला बैस.’

45 आता, मग जर दाविद त्याला ‘प्रभु’ म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”

46 पण परूश्यांपैकी कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.

येशू धार्मिक पुढाऱ्यांवर टीका करतो

23 मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत. म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.

“ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या [d] मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात. मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते.

“परंतु तुम्ही स्वतःला ‘गुरूजी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. आणि जगातील कोणालाही ‘पिता’ म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. 10 तुम्ही स्वतःला ‘मालक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. 11 तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. 12 जो स्वतःला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.

13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. 14 [e]

15 “परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहाता आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता.

16 “तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, ‘जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.’ 17 तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते.

18 “आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पहिजे. 19 तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी. 20 म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. 21 तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. 22 जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.

23 “परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत. 24 तुम्ही आंधळे वाटाडे आहात. जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही आहात.

25 “अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत. 26 अहो परुश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.

27 “अहो परुश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत. 28 तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते. पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात.

29 “अहो, परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरा बांधता. आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता. 30 आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती. 31 पण ज्यांनी ज्यानी त्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता. 32 पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.

33 “तुम्ही साप आहात. विषारी सापाची पिल्ले आहात! तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल. 34 मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल. त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल.

35 “म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्या [f] काळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल. 36 मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.

यरूशलेमच्या लोकांना येशू सावध करतो

37 “अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस. 38 आता तुझे घर उजाड होईल. 39 मी तुला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. [g] असे म्हणेपर्यंत तू मला पाहणार नाहीस.’”

मत्तय 21:23-23:39